हॅरियेट बीचर स्टोव डेव्हीड अॅडलर चित्र : कोलीन बुटमन मराठी: सुशील मेन्सन " मला माझं आयुष्य व्यर्थ फुकट घालवायचं नाही ." हॅरियेट बीचर स्टोव लिहिते . अशा विचारातूनच कदाचित हॅरियेटने प्रथम एक शिक्षिका व नंतर एक लेखिका म्हणून भरीव कामगिरी केली आणि आपले आयुष्य सार्थकी लावले. आयुष्यभर तिने इतरांना मदतीचा हात पुढे केला. हॅरियेटने लिहिलेले “ अंकल टॉमची केबिन " हे पुस्तक अत्यंत खळबळजनक ठरले. या पुस्तकाद्वारे तिने गुलामगिरी प्रथेत चाललेली भयानक क्रूरता जनतेसमोर आणली. हे पुस्तक वाचून लोकांच्या हृदयात करुणा जागी झाली आणि गुलामगिरी प्रथेविरुद्ध जनमत तयार होऊ लागले. अब्राहम लिंकन अध्यक्षपदाची निवडणूक जिंकले त्यात हॅरियेटच्या या पुस्तकाचाही वाटा आहे, असे म्हटले जाते. पुस्तक छापून आल्यानंतर चारच वर्षांत नागरी युद्ध सुरू झाले आणि मग गुलामगिरी प्रथा बंद झाली . हॅरियेट बीचर स्टोव लोकांना न्याय मिळवून देऊ इच्छित होती. लोकांच्या आयुष्यात बदल घडवू पाहात होती . लोकांनी हॅरियेटला संकटातून मुक्त करणारी नायिका मानले. लोकांसाठी ती नेहमीच स्फूर्तीचे स्थान ठरली. हॅरियेट बीचर स्टोव डेव्हीड अॅडलर ; चित्र : कोलिन बुटमन ; मराठी : सुशील मेन्सन हॉलिडे हाऊस, न्यूयॉर्क 1862 साली अध्यक्ष अब्राहम लिंकन हॅरियेट बीचर स्टोवला प्रथमच भेटले . तिच्याशी हस्तांदोलन केल्यावर ते तिला गंमतीने म्हणाले, “ अच्छा! तूच ती छोटीशी स्त्री आहेस जिच्यामुळे एवढे मोठे युद्ध सुरू झाले.” हॅरियेट बीचर स्टोवने “ अंकल टॉमची केबिन " हे पुस्तक लिहिले. ते त्याकाळी सर्वाधिक खपाचे पुस्तक ठरले. हे पुस्तक वाचल्यानंतर लोकांच्या मनात गुलामगिरी प्रथेविरुद्ध प्रचंड चीड उत्पन्न झाली आणि ते नागरी युद्ध लढण्यासाठी प्रेरित झाले . हॅरियेट बीचर स्टोवचा जन्म 14 जून 1811 रोजी अमेरिकेच्या कनेक्टिकट राज्यातील लिचफील्ड प्रांतात झाला. ती रोक्साना आणि लेमन बीचर या दांपत्याची सातवे अपत्य होती. तिला पाच भाऊ आणि तीन बहिणी होत्या . हॅरियेटची आई स्वभावाने समजूतदार आणि शांत होती. तिला पुस्तके वाचण्याची खूप आवड होती. परंतु हॅरियेटला आपल्या आईचा सहवास फार काळ लाभला नाही . 1816 साली रोक्साना बीचरला क्षय ( टी. बी .) रोगाने पछाडले आणि त्यातच तिचे निधन झाले. त्यावेळी हॅरियेट फक्त पाच वर्षांची होती. लेमन बीचर एक पाद्री होते . ते एक कठोर पालकही होते. आपल्याला सारी मुलेच व्हावीत , मुली नकोत अशी त्यांची अपेक्षा असे. हॅरियेटचा जन्म झाला तेव्हा ते नाराजीने म्हणाले, “ मला मुलगा हवा होता”. ते मुलांना पाद्री बनवू इच्छित होते . यामुळे त्यांचे कार्य घराण्यात अविरत सुरू राहील असे त्यांना वाटे . रोक्साना बीचरच्या निधनानंतर लेमन बीचरने हॅरियेट पोर्टरशी लग्न केले . हॅरियेट बीचरनुसार तिची ही नवी आई अतिशय सुंदर आणि न्यायप्रिय होती . पण ती कठोर होती आणि मुलांकडून सतत योग्य वर्तणुकीचा आग्रह धरत असे . लेमन आणि त्यांच्या दुसऱ्या पत्नीला तीन मुले झाली. नाजूक , छोटीशी हॅरियेट बीचर स्वभावाने खूप शांत आणि लाजरी होती. ती नेहमी आपल्या विश्वामध्येच दंग असे . पण कधी कधी ती चंचल होत असे . मग तिच्यात चैतन्य संचारत असे. हॅरियेटला वाचनाचा नाद होता. तिला एकदा आपल्या वडिलांच्या पुस्तकसंग्रहामध्ये “ अरेबियन नाइट्स ” हे पुस्तक दिसले . तिने ते पुन्हा पुन्हा वाचले . 1824 साली तेरा वर्षांची असताना हॅरियेट तीस मैल दूर असलेल्या हार्टफर्ड प्रांतात गेली . तिथे तिने हार्टफर्ड महिला विद्यालयामध्ये प्रवेश घेतला. हॅरियेटची मोठी बहीण कॅथरीन तिथे संचालक पदावर होती. हॅरियेटला लिखाण करणे आवडत असे. आपण चांगले लिहू शकतो, हे तिला शाळेत असतानाच जाणवले . आपल्या या कौशल्याचा पुरेपूर उपयोग करण्याचे तिने ठरवले. आपल्या भावाला लिहिलेल्या पत्रात ती म्हणते , “ मला माझं आयुष्य व्यर्थ फुकट घालवायचं नाही ." हॅरियेट बुद्धिमान होती आणि तिची स्मरणशक्तीही खूप चांगली होती. वयाच्या सोळाव्या वर्षीच ती शाळेत शिकवू लागली. तिचे कित्येक विद्यार्थी तिच्या स्वत: च्याच वयाचे होते. 1832 साली लेमन बीचर ओहायो राज्यातील सिनसिनाटी शहरात लेम थियोलॉजिकल सेमिनरी चे अध्यक्ष बनले . यामुळे त्यांचे कुटुंब ओहायोत राहायला गेले . कनेक्टिकट आणि ओहायो ही गुलामगिरी प्रथेपासून मुक्त असलेली राज्ये होती . परंतु ओहायो नदीच्या पलिकडे असलेल्या केंटकी राज्यात मात्र गुलामगिरी प्रथा सुरुच होती . हॅरियेटने गुलामगिरी प्रथेबद्दल सर्वप्रथम वृत्तपत्रांमध्ये वाचले. सिनसिनाटी जर्नल या वृत्तपत्राच्या संपादकांनी लिहिले होते , “नदीच्या घाटावर इमिग्रंट नावाचे एक जहाज होते. त्यात मालाच्या ऐवजी व्हर्जिनिया आणि केंटकी येथून खरेदी केलेले गुलाम भरले होते . या गुलामांना दक्षिणेतील राज्यांमध्ये विकण्यासाठी नेत होते.” संपादकांनी पुढे लिहिले, “ गुलामांचा धंदा करणाऱ्या व्यापाऱ्यांनी अश्रृंच्या नद्या वाहावल्या होत्या. गुलामांना साखळदंडांनी जखडले होते आणि त्यांच्या शरीरातून रक्त वाहात होते." हॅरियेटने सिनसिनाटीतील वृत्तपत्रांमध्ये काही जाहिराती पाहिल्या. त्यात पळून गेलेल्या गुलामांना पकडून देणाऱ्यांना पुरस्कार देण्याची घोषणा केली होती . गुलामगिरी प्रथेविरुद्ध आवाज उठवणाऱ्या “ अबोलिशनिस्ट ” लोकांची हत्या करणाऱ्यांनाही पुरस्कार जाहीर केला होता . 1833 साली उन्हाळ्याच्या सुट्टीत हॅरियेट एका शेतात गेली . तिने स्वत: च्या डोळ्यांनी तेथील गुलामांची दयनीय अवस्था पाहिली. गुलामांच्या मालकांचे उद्दाम आणि असंस्कृत वर्तनही तिने पाहिले . या प्रत्यक्ष अनुभवाचा हॅरियेट बीचरच्या मनावर खोल परिणाम झाला. हिवाळ्याच्या दिवसांत सेमिनरीत ( विद्यालयात ) एक नवीन शिक्षक कॅलविन स्टोव आणि त्यांची पत्नी एलिझा राहाण्यास आले. लवकरच हॅरियेट आणि एलिझामध्ये चांगली मैत्री झाली. पुढे एलिझा आजारी पडली आणि दुर्दैवाने त्यातच मृत्यू पावली. हॅरियेटला अतोनात दुःख झाले . हॅरियेट आणि कॅलविन स्टोव यांनी दुःखात एकमेकांना खंबीर साथ दिली . या काळात ते एकमेकांना अधिक जवळून ओळखू लागले . 6 जानेवारी 1836 रोजी त्या दोघांनी लग्न केले . पुढे त्यांना सात अपत्ये झाली – एलिझा, हॅरियेट, हेन्री, फ्रेडरिक , जॉर्जियाना, सॅम्युअल आणि चार्ल्स. कधीकधी हॅरियेट आणि कॅलविन एकमेकांशी फार प्रेमाने वागत. हॅरियेटने एकदा कॅलविनला लिहिले, “ जर तुम्ही माझे प्रिय पती नसता तर मी तुमच्या प्रेमात पडले असते.” कधी ते एकमेकांशी बऱ्यापैकी वादही घालत . एकदा कॅलविनने हॅरियेटला लिहिले , “ एखादी वस्तू जागेवर सापडली नाही किंवा एखादी गोष्ट वेळेवर केली नाही तर मला भयंकर राग येतो आणि मग वाटतं की घरातल्या वस्तू इतस्तत: पसरवण्याचा तुला छंदच आहे.” कॅलविनने आणखी एक तक्रार केली, “ जेव्हा तू एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करतेस तेव्हा जगात केवळ तीच एक गोष्ट अस्तित्वात आहे असं तुला वाटतं .” हॅरियेटसाठी तीच एक गोष्ट म्हणजे तिचे लिखाण होते . हॅरियेटने भूगोलाचे एक पाठ्यपुस्तक लिहिले , कथा लिहिल्या तसेच वृत्तपत्र आणि मासिकांसाठी बरेच लेखही लिहिले. 1843 साली तिच्या कथांचे संकलन पुस्तकरुपात प्रकाशित झाले . कॅलविनने हॅरियेटला लिखाणासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले . हॅरियेट न्यूयॉर्कला असताना कॅलविनने तिला लिहिले, “प्रिये, तू एक साहित्यिक आहेस . तुझ्या नशिबात लेखक बनणंच लिहिलं आहे. ” 1850 साली कॅलविनने मेन राज्यात ब्रुन्सविक प्रांतात असलेल्या बॉडॉईन कॉलेजमध्ये शिक्षकाची नोकरी स्वीकारली. यानंतर स्टोव कुटुंब मेन येथे गेले. पुढल्याच वर्षी हॅरियेटने एक कथा लिहिण्यास सुरूवात केली – “ अंकल टॉमची केबिन .” ही कथा म्हातारा गुलाम टॉम आणि त्याचा क्रूर मालक सायमन लेग्री यांच्याबद्दल होती. हॅरियेटने ही कथा गुलामगिरी प्रथेला विरोध करणारे वृत्तपत्र "नॅशनल एरा’ मध्ये प्रकाशित करण्यासाठी लिहिली होती . दर आठवड्याला एक भाग या पद्धतीने ही कथा छापली जाणार होती. प्रथम तिला वाटले की पूर्ण कथा तीन- चार भागांत संपेल. पण पुढे ती चाळीस भाग चाळीस आठवडे चालली. 1852 साली हे सगळे भाग एकत्र होऊन पुस्तकरुपात प्रकाशित झाले . या पुस्तकात सायमन लेग्री टॉमला पळून गेलेल्या दोन गुलामांच्या लपण्याची जागा खोदूनखोदून विचारतो, “ मी तुझ्या अंगातला रक्ताचा एक -एक थेंब मोजीन . तू सांगत नाहीस तोवर मी तुझं रक्त शोषत राहीन .” पण टॉम आपले तोंड बंद ठेवतो . त्यामुळे त्याला खूप मारही मिळतो. सायमन लेग्रीने केलेल्या आत्यंतिक छळामुळे शेवटी टॉमचा मृत्यू होतो . _ “ मी तुला क्षमा करतो , अगदी मनापासून क्षमा करतो,” मरताना टॉम सायमनला म्हणतो. UNCLE TOMS CABIN " अंकल टॉमची केबिन " PHism Rah | 11m NCRETmter . “ अंकल टॉमची केबिन” हे थोड्याच काळात सर्वाधिक खपाचे पुस्तक ठरले. लाखो लोकांनी पुस्तकातील टॉम , एलिझा आणि इतर पात्रांद्वारे गुलामगिरी प्रथेतील जाच व क्रूर छळाचा अनुभव घेतला. ज्या लोकांनी गुलामगिरी प्रथेमध्ये सर्रास चालणाऱ्या अन्यायाबद्दल कधी कल्पनादेखील केली नव्हती, ते लोकही आता गुलामगिरी प्रथेचा तिरस्कार करू लागले. या पुस्तकामुळे जनतेच्या मनात गुलामगिरी प्रथेविरुद्ध चीड निर्माण झाली . अध्यक्ष अब्राहम लिंकन यांना निवडणुक जिंकण्यासाठी या गोष्टीचा खूप फायदा झाला. हॅरियेट बीचरचे पुस्तक “ अंकल टॉमची केबिन ” हे अमेरिकन नागरी युद्धासाठी निश्चितच एक कारण बनले . हॅरियेट बीचर स्टोवने इतरही काही पुस्तके, लेख , कथा आणि कविता लिहिल्या. पण यांतील एकही “ अंकल टॉमची केबिन" एवढे प्रभावी ठरले नाही . 1852 साली स्टोव कुटुंब मॅसेच्युसेट प्रांतातील एंडोव्हर या शहरात राहाण्यास गेले. कॅलविनला ‘एंडोव्हर थियोलॉजिकल सेमिनरी मध्ये प्राध्यापकाची नोकरी मिळाली . 1863 साली कॅलविन तिथून निवृत्त झाला. मग ते कुटुंब पुन्हा कनेक्टिकट राज्यातील हार्टफर्ड प्रांतात परतले . 1866 साली कॅलविनचे निधन झाले. त्यानंतर हॅरियेट क्वचितच घराबाहेर पडू लागली. 1 जुलै 1896 रोजी हॅरियेटचे निधन झाले . लहान चणीच्या, सडपातळ हॅरियेट बीचर स्टोवला लोक लिटल लेडी म्हणत. या लिटल लेडीने गुलामगिरी प्रथेत गुलामांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध संपूर्ण राष्ट्राला जागे केले . यामुळेच अमेरिका राष्ट्राचे भवितव्य आखण्यात हॅरियेटचाही मोठा वाटा आहे, असे निश्चितपणे म्हणता येते . लेखकाचे मनोगत हॅरियेट बीचर स्टोवच्या पुस्तकातील टॉम हे पात्र एखाद्या आदर्श नायकासारखे नाही . काही लोकांच्या मते, “ अंकल टॉमची केबिन " ही एक वंशवादी कथा आहे. लोक काहीही म्हणोत, पण या पुस्तकाने अमेरिकेतील गुलामगिरी प्रथा बंद पाडण्यात हातभार लावला, हे कुणीच नाकारू शकत नाही . 1853 या एकाच वर्षात “ अंकल टॉमची केबिन " या पुस्तकाच्या तीन लाखांपेक्षाही जास्त प्रती खपल्या . 1860 साली न्यूयॉर्कच्या कायदेमंडळाचे सदस्य विलियम सेवेर्ड आणि मॅसेच्युसेटच्या कायदेमंडळाचे सदस्य चार्ल्स सुमनेर यांनी अब्राहम लिंकनच्या अमेरिकेच्या अध्यक्षपदी झालेल्या निवडीचे बरेचसे श्रेय “ अंकल टॉमची केबिन " या पुस्तकाला दिले . ___ 1899 साली कर्क मन्रो या अमेरिकन लेखकाने त्याच्या " लाइव्हस अँड डीड्स ऑफ अवर सेल्फ - मेड मेन " या पुस्तकात हॅरियेट बीचर स्टोवबद्दल लिहिले की ती अमेरिकेतील सर्वश्रेष्ठ स्त्रियांपैकी एक आहे आणि अमेरिकेचे भवितव्य आखण्यात तिचाही मोठा वाटा आहे . महत्वपूर्ण तारखा 1811 1816 1824 1832 1836 1850 1851 14 जून , लिचफील्ड, कनेक्टिकटमध्ये जन्म आई रोक्साना बीचरचे क्षय ( टी . बी.) रोगाने निधन . बहिणीद्वारे संचालित हार्टफर्ड महिला विद्यालयात शिक्षण. वडिलांची ओहायो राज्यातील सिनसिनाटी शहरात बदली. कॅलविन स्टोवशी लग्न . कुटुंबासोबत मेन राज्यातील ब्रुन्सविक शहरात राहायला गेली . “ अंकल टॉमची केबिन” कथेचे काही भाग प्रकाशित . पुढच्याच वर्षी पुस्तकरुपात प्रसिद्ध. कुटुंबासोबत मॅसेच्युसेट प्रांतातील एंडोव्हर शहरात वास्तव्य . अध्यक्ष अब्राहम लिंकन यांची भेट . कुटुंबासोबत कनेक्टिकट राज्यातील हार्टफर्ड प्रांतात परतली. 1 जुलै रोजी हार्टफर्ड येथे निधन . 1852 1862 1863 1896